गुआंगशी, 22 मार्च 2022: चीनमधील गुआंगशी येथे सोमवारी दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व 132 जणांचा मृत्यू झाला. चायना इस्टर्न पॅसेंजर एअरलाईन्सचे हे विमान गुआंग्शीच्या डोंगरात कोसळले. विमानात 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. ज्या टेकडीवर हे विमान कोसळले त्याची काही छायाचित्रे समोर आली आहेत. विमान अपघातानंतर तिथल्या जंगलात आग लागल्याचे त्यांच्यात दिसत आहे.
लँडिंगच्या 43 मिनिटांपूर्वी विमानाचा संपर्क तुटला
चीनचे सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सनुसार, फ्लाइट एमयू 5735 ने कुनमिंग चांगशुई विमानतळावरून दुपारी 1.15 वाजता उड्डाण केले. हे विमान दुपारी तीन वाजता ग्वांगझूला पोहोचणार होते. वृत्तानुसार, विमान दोन मिनिटांत 30,000 फूट खाली पडले. 563 किमी/तास वेगाने पर्वतांवर आदळल्यानंतर अपघात झाला.
उड्डाणानंतर 71 मिनिटांत हे विमान अपघाताचे बळी ठरले. लँडिंगच्या 43 मिनिटांपूर्वी विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला. प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोईंग 737 आहे. बोइंग साडेसहा वर्षांपासून विमानसेवेत कार्यरत होते. या अपघाताबाबत चायना इस्टर्न एअरलाइन्सकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. मात्र, दुर्घटनेतील मृतांच्या सन्मानार्थ त्याची वेबसाइट ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आली होती.
या मॉडेलची विमाने यापूर्वी अनेकदा अपघाताला बळी पडली आहेत. मात्र, अपघाताला बळी पडलेल्या विमानाची डिलिव्हरी बोईंगने 2015 मध्येच केली होती.
चीनी मीडियानुसार, विमान गुआंग्शीमधील वुझोउ शहराजवळ कोसळले. एका गावकऱ्याने सांगितले की, विमान पडताच आग लागल्याने आजूबाजूचे जंगल राख झाले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले की, त्यांना अपघाताचा धक्का बसला आहे. त्यांनी शोक व्यक्त करत अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले.
चीनमध्ये विमान अपघातानंतर आणि सर्व 737-800 विमानांचे उड्डाण थांबवण्याच्या एअरलाइन कंपनीच्या घोषणेनंतर बोइंगचे शेअर्स 8% इतके घसरले. जगभरात 4,200 बोईंग विमाने सेवेत आहेत. त्यापैकी 1,177 एकट्या चीनमध्ये आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे