गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा सांगली येथे बांगलादेशी तरुणीवर बलात्कार करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलला...

सांगली येथे बांगलादेशी तरुणीवर बलात्कार करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलला अटक

सांगली, ९ फेब्रुवारी २०२३ : सांगली जिल्ह्यात एका १७ वर्षीय बांगलादेशी मुलीवर बलात्कार करून तिच्याकडून विविध बहाणा करून सात लाख रुपये उकळल्याप्रकरणी एका पोलिस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. आरोपी पोलिस कर्मचारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तैनात आहे.

याविषयी अधिक माहिती अशी, की सदर तरुणी बांगलादेशची रहिवासी असून, ती सध्या सांगलीच्या झोपडपट्टीत राहत होती. अधिकारी म्हणाले, की ही घटना जानेवारीची आहे. तिच्या झोपडपट्टीत घुसून कॉन्स्टेबलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास परवानगी देण्याच्या बदल्यात दोन लाख रुपये घेतले. कॉन्स्टेबलने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून हवालदाराला अटक केली असून, त्याचे निलंबन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सांगलीत एका महिलेसोबत राहणाऱ्या बांगलादेशातील १७ वर्षीय पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप निलंबित हवालदारावर आहे. पीडितेला पोलिसांपासून वाचविण्यासाठी आरोपी हवालदाराने दोन लाख रुपये आणि मुलीला आश्रय देणाऱ्या महिलेकडून पाच लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी हवालदाराने पोलिसांच्या छाप्याबाबत आगाऊ माहिती देऊन सावध करतो, असे सांगून पीडित महिला व अल्पवयीन पीडितेकडून पैसे घेतले होते. सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करीत असून, या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version