काठमांडू, २५ फेब्रुवारी २०२३ : नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता कायम आहे. दरम्यान, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने पुष्प कमल दहल यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे; तसेच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे नेपाळी काँग्रेसने ज्येष्ठ नेते रामचंद्र पौडेल यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. पौडेल यांना ८ पक्षांच्या नव्या युतीचा पाठिंबा असणार आहे.
रामचंद्र पौडेल यांचे राष्ट्रपती बनणे जवळपास निश्चित मानले जात आहे. ते विधादेवी भंडारी यांची जागा घेतील. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज २५ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केले जात असून ९ मार्च रोजी मतदान होणार आहे. नेपाळी काँग्रेस, सीपीएन-माओवादी सेंटर, सीपीएन-युनिफाइड सोशलिस्ट, राष्ट्रीय जनमोर्चा, नागरिक उन्मुक्ती पार्टी आणि जनमत पार्टी या आठ राजकीय पक्षांनी संयुक्त बैठकीत नेपाळी काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपतिपदावरुन दहल यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ आणि माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ यांच्यात मतभेद कायम आहेत. २५ डिसेंबर रोजी नवीन सत्ताधारी युती अस्तित्वात आली तेव्हा राष्ट्रपतिपद ‘यूएमएल’ला दिले जाणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर