पुणे, १५ एप्रिल २०२३: जुन्या पुणे-मुंबई हायवेवर खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे चार वाजता बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ बस दरीत कोसळली. यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या दवाखान्यात हलवण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील एसपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. बचावकार्य अजूनही सुरू आहे. बस काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली आहे. गोरेगाव परिसरातील एका संघटनेचे लोक बसमध्ये प्रवास करत होते. हे सर्वजण पुण्यात एका कार्यक्रमाला गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसचा अपघात झाला. जखमींना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. त्याचबरोबर स्थानिक लोकही पोलिसांना बचावकार्यात मदत करत आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस सुमारे २०० फूट खोल खड्ड्यात पडली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एसपींनी सांगितले की, जखमींना बाहेर काढले जात असून त्यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले जात आहे. ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड