औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न पेटला; खासदार इम्तियाज जलील यांचे कलेक्टर ऑफिससमोर साखळी उपोषण

छत्रपती संभाजीनगर, ४ मार्च २०२३ : औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न पेटताना दिसत आहे. एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावला आहे; मात्र औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शविला आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला होता. यावर आंदोलन करणार असल्याचेही जाहीर केलं होते; मात्र जी- २० परिषद असल्याकारणाने हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते. आजअखेर औरंगाबाद नामांतरविरोधी कृती समितीकडून ४ मार्च रोजी औरंगाबाद कलेक्टर ऑफिससमोर खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणास सुरवात केली आहे.

यावेळी खासदार जलील म्हणाले की, या उपोषणाला बसलेल्या नागरिकांच्या जन्मापासून औरंगाबाद असे शहराचे नाव होते आणि ते नाव तसेच ठेवले पाहिजे. हे नाव बद्दलताना कोणाच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही हे नाव बदलले आहे. ३०-३५ वर्षांपूर्वी एका पक्षाचे मोठे नेते येथे येऊन म्हणतात, मला या शहराचे नाव संभाजीनगर ठेवायचं आहे. त्यांची भावना विचारात घेऊन हा निर्णय घेतला जातो. तर मी येथून निवडून आलेला खासदार आहे. माझी भावना महत्त्वाची नाही का? असेही जलील यावेळी म्हणाले. ही हुकूमशाही आहे का? दिल्लीत बसणारे एखादे मंत्री किंवा पंतप्रधान म्हणतात, आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि तो तुम्हाला मान्य आहे. हे दुसऱ्याला मान्य असेल; पण हे इम्तियाज जलील आणि औरंगाबादकरांना मान्य नाही. हे आम्हाला मान्य नाही आणि लोकशाही मार्गाने आम्ही विरोध करणार आहे.

औरंगाबादचे नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने शनिवारपासून (ता. ४) कलेक्टर ऑफिससमोर साखळी उपोषणास सुरवात झाली आहे. नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात आहे. रात्रंदिवस बेमुदत असे हे उपोषण असणार आहे, असेही ते म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा