नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर २०२२: सध्या देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक विशेष भेट / सोय केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने आगामी छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर ट्रेनमधील अतिरिक्त गर्दीचा सामना करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी
१७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या विशेष रेल्वे २ हजार २६९ फेऱ्या करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना या गाड्यांमध्ये निश्चित तिकीट मिळणार आहे. तसेच या निर्णयामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अतिशय सोपा आणि सुरळीत होणार आहे. दरम्यान, दिल्ली-पाटणा, दिल्ली-भागलपूर, दिल्ली-मुझफ्फरपूर, दिल्ली-सहरसा इत्यादी देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी विशेष गाड्यांचे नियोजन देखील करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेकडे पूर्ण लक्ष
यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत, असे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गाड्या सुरळीत चालाव्यात यासाठी प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन कर्तव्यावरील अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.