हिंजवडी २ ऑगस्ट २०२५ : हिंजवडीच्या गावठाण हद्दीतील प्रस्तावित रस्ता रुंदीकरण प्रकल्पाने शुक्रवारी ग्रामसभेत अक्षरशः रणशिंग फुंकले! रस्ता रुंदीकरणाचे नेमके अंतर किती असावे, यावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली. “तुम्ही आयटीवाल्यांना वेळ देता, पण आम्हाला गृहीत धरता,” असा थेट आरोप करत ग्रामस्थांनी, “आमचे म्हणणे ऐकून घ्या, अन्यथा न्यायालयात जाण्यासही मागे हटणार नाही,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गावठाण परिसरात सुरू असलेल्या या वादग्रस्त रस्ता रुंदीकरण प्रक्रियेवर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या सभेत गावचे आजी-माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितले की, प्रस्तावित ३६ मीटर रुंदीकरणामुळे गावातील प्राचीन मंदिरे, स्मशानभूमी, दशक्रिया विधीचे ठिकाण, होळीचा पार, शाळा, अगदी ग्रामपंचायत कार्यालय आणि कित्येक पिढ्यांपासूनची घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे, किमान या रस्त्याच्या बाबतीत तरी प्रशासनाने स्थानिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या भावनांचा आदर करावा, अशी कळकळीची विनंती ग्रामस्थांनी केली.
सरपंच गणेश जांभुळकर यांनी तीव्र शब्दांत सांगितले, “उपमुख्यमंत्री अजित पवार आयटी क्षेत्रातील लोकांना वेळ देतात, पण आपल्या स्थानिक ग्रामस्थांना भेटायला वेळ नाही. हिंजवडीचे ग्रामस्थ इतर विकासकामांमध्ये पूर्ण सहकार्य करत आहेत, पण गावठाणाचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. यासाठी त्यांनी एकदा आम्हाला वेळ द्यावा आणि आमची बाजू समजून घ्यावी, त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा.” ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हिंजवडीतील वातावरण चांगलेच तापले असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. गरज पडल्यास न्यायालयात लढा देण्याची तयारीही ग्रामस्थांनी दर्शवली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

हिंजवडी गावठाण रणशिंग रस्ता रुंदीकरणावरून ग्रामस्थ पेटले