मुंबई ४ सप्टेंबर २०२२ : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समूहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पालघरच्या चारोटी परिसरात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यांची मर्सिडिज डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. अपघातात मिस्त्री यांच्या चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. चालकाचा ताबा सुटला आणि मर्सिडिज गाडी ही पूलावरील डिव्हायडरला धडकली. दरम्यान, मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.
कसा झाला अपघात ?
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालघर येथील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हि माहिती दिली आहे.
टाटा-मिस्त्री वाद
शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के भागीदारी आहे. रतन टाटा यांच्या जागी पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना २०१२ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, परंतु चार वर्षांनंतर २०१६ मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद होते. टाटा समूहानेच टाटा सन्समधील एसपी ग्रुपची हिस्सेदारी खरेदी करण्याची ऑफर दिली होती, ज्यासाठी मिस्त्री कुटुंब तयार नव्हते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते ज्याने टाटांच्या बाजूने निकाल दिला होता.
कोण होते सायरस मिस्त्री ?
सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म ४ जुलै १९६८ साली झाला होता. २८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर २४ ऑक्टोबर २०१६ रोजी त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यांना भारताबरोबर परदेशात हि अनेक पदवीने सन्मानित करण्यात आले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव