‘बलोच’ चित्रपटासाठी ५० लोकांची टीम, ५० डिग्री तापमानात करत होती चित्रिकरण.

मुंबई ३ मे २०२३: प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘बलोच’ चित्रपटाचे चित्रीकरण हे जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५० डिग्री तापमानात झाले आहे. दिवसा इथले तापमान ५० डिग्री असायचे तर रात्री हे तापमान ९,१० अंशाखाली पर्यंत उतरायचे. अशा थंड गरम वातावरणात, चित्रपटातील सर्व कलाकारांनी चित्रीकरण पूर्ण केले.

रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे खूप आव्हानात्मक होते. चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक दुखापत सुदैवाने झाली नाही. आपले पूर्वज या रखरखत्या उन्हात कसे लढले असतील, याचा अंदाज करणे सुद्धा कठीण असल्याचे तसेच पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहे असे बलोच च्या टीम ने सांगितले.

पानिपतच्या लढाई नंतर मराठ्यांचे भयाण वास्तव दाखवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले. ऐतिहासिक असला तरी मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.

‘बलोच’ या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. ‘बलोच’मध्ये प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत ‘बलोच’ ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा