जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चकमक, सुरक्षा दलांकडून एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर, 20 जून 2022: जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षा दल सतर्क आहेत, तर दहशतवादीही डोके वर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नागरिकांची हत्या करून दहशत पसरवण्याचे दहशतवादी प्रयत्न करत असताना काश्मीर खोऱ्यात चकमकीच्या घटनाही समोर येत आहेत. रविवारी रात्री उशिरा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चतपुरा भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.


या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी उशिरा पोलीस आणि सुरक्षा दलाचे पथक गस्तीवर निघाले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. पुलवामा जिल्ह्यातील चतपुरा भागात ही घटना घडली. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.


सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. एका दहशतवाद्याला ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी चतपुरा येथील संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम सुरू केली आहे. चतपुरा भागात आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता सुरक्षा दलांना आहे.


विशेष म्हणजे एकाच दिवसात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक होण्याची ही तिसरी घटना आहे. पुलवामा येथील चतपुरापूर्वी चकमकीच्या आणखी दोन घटना घडल्या. कुपवाडा आणि कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत एकूण चार दहशतवादी मारले गेले. यापूर्वीही दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक अनेक नागरिकांना लक्ष्य केले होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा