बारामती, दि.३ मे २०२०: कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्याचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. सुतार समाज हा ग्रामीण भागात
खेडेगावांमध्ये शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे बनवून देण्याचे काम करतो. कामाच्या बदल्यात तो शेतकी माल शेतकऱ्यांकडून घेतो. काही लोक त्याच्या बदल्यात पैसे देत असतात आणि त्यावर ते आपला जीवनाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, हातावरचे पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन
लाकूडकाम व्यवसाय बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे.
घरगुती व इतर फर्निचरचे काम बंद असल्याने सुतार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठवडयात काम बंद आहे, आगामी काही दिवस काम बंद राहणार असल्याने या कारागीरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. त्यातच जीवनाशक्य वस्तू संपल्या असून रोज हातावरचे पोट असल्याने पैसे आणायचे कोठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे.सुतारकाम या क्षेत्रातील कामगार हे असंघटित कामगार आहेत. आज जवळपास ८०% समाज अजूनही कारागिरी व लाकडी फर्निचरचेच काम करतो. आता यंत्रांनी पारंपरिक काम करणाऱ्यांची जागा घेतल्याने, हा समाज कोरोना व संचारबंदीमुळे पूर्णपणे खचला आहे.
खेड्यापाड्यातील सुतारकाम करणायाची स्थिती यापेक्षाही भयानक आहे. या
कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
शासनाने प्रत्येक गावातील शासकीय अधिकाऱ्यांमार्फत माहिती मागवून समाजाला योग्य ती मदत देण्याची गरज आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव