पश्चिम बंगाल, 14 जानेवारी 2022: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळ गुरुवारी संध्याकाळी एक मोठा रेल्वे अपघात झाला. बिकानेर एक्स्प्रेस (15633) मैंगुडी येथे रुळावरून घसरली. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 40 जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही ट्रेन राजस्थानमधील बिकानेरहून आसाममधील गुवाहाटीला जात होती. एनडीआरएफचे पथक आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. यासोबतच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचबरोबर गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष घटनास्थळी रवाना झाले आहेत. त्याचबरोबर स्वतः रेल्वेमंत्रीही दिल्लीहून घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेणार आहेत.
ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली. बिकानेर एक्सप्रेस ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डबे पूर्णपणे उलटले आहेत. यातील एक डबाही पाण्यात उतरला असून, त्यातून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे. जवळपासच्या कोणत्याही स्टेशनवर थांबा नव्हता आणि ट्रेन त्या भागातून जात होती. एनडीआरएफसह स्थानिक बचाव कार्य पथक घटनास्थळी आहे.
जखमी प्रवाशांना उपचार देण्यासाठी 30-40 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या असून सिलीगुडीहून एक रिलीफ ट्रेन पाठवली जात आहे. उत्तर बंगालमधील वैद्यकीय महाविद्यालयांना अलर्टवर ठेवण्यात आलंय. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगण्यात आलंय.
रेल्वे अपघातात सुमारे 20 जण जखमी झाल्याची माहिती जलपाईगुडीच्या डीएमने दिली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. सीपीआरओ रेल्वे कॅप्टन शशिकिरण यांनी सांगितलं की, राजस्थानमधील बिकानेर येथून 308 प्रवासी निघाले होते.
रेल्वे अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही चर्चा केलीय. कोविड-19 मुळं उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आयोजित बैठकीत सीएम ममता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींशी जोडल्या गेल्या होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे