कापूस लागवडीसाठी लढवली नामी शक्कल, नंदुरबारच्या शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

नंदुरबार, ११ जून २०२३ : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीची शक्यता आहे. मात्र कापसाला बाजारभाव मिळत नसल्याने आणि मजूर टंचाईमुळे कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. यावर शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राच्या सहाय्याने कापूस लागवड सुरु केली असून यातून कमी बियाण्यात आणि समान अंतरावर कापसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाई पासून दिलासा मिळाला आहे. यामुळे मजुरीचा खर्च तसेच बियाण्याचाही खर्च कमी होत आहे. जमिनीत योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर लागवड होत असल्याने उगवण क्षमता ही चांगली असल्याचे दिसून आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी लालसिंग राजपूत पाच एकर कापूस लावण्यासाठी दहा ते पंधरा मजुरांची गरज भासत होती. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपयापर्यंत मजुरी मजुरांना द्यावी लागत होती. तसेच कापसाचे बियाणेही जास्त लागायचे आणि कापसाच्या दोन झाडातील अंतर कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही होत होता. मात्र या मशीनच्या सहाय्याने कापूस लागवड केल्याने मजुरीच्या पैशात आणि बियाण्याच्या पैशातही बचत होत असल्याचे सांगण्यात येते आहे. जर लागवडीच्या खर्चाचा अंदाज पाहिला तर दहा मजुरांचा मजुरीचा खर्च वाचून एकच मनुष्य कापूस लागवडीचे काम करु शकतो. एकाच वेळेस एक बी योग्य अंतरावर जात असल्याने योग्य खोलीवर असल्याने उगवण क्षमता चांगली आहे. कापसाचे झाडाचे अंतर समान राहत असल्याने उत्पादनासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे मजुरी आणि बियाण्याच्या खर्चामध्ये कपात होत आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीनद्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार शेतकऱ्यांनी या मशीनचा उपयोग केला असून यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असून मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापसाची लागवड पूर्ण होत असल्याने ते शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात विविध कंपनीद्वारे मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होते. मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास मजूर टंचाईसारख्या समस्येवर शेतकऱ्यांना मात करुन कष्ट आणि पैशांची बचत होवू शकते हे चित्र समोर आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा