राज्यातील असं गाव, जिथं 50 वर्षांपासून मंदिर-मशिदीवर वाजत नाहीत लाऊडस्पीकर

नांदेड, 20 एप्रिल 2022: राज्यात मशिदीवर लाऊडस्पीकर वाजवण्यावरून राजकारण जोरात सुरू आहे. दुसरीकडं, नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायतीने पाच वर्षांपूर्वी मंदिर-मशीद-बुद्ध विहारमध्ये कोणताही वादविवाद न करता लाऊडस्पीकर वाजविण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच बारड हे असं गाव आहे, जिथं लाऊडस्पीकर वाजत नाहीत.

नांदेड जिल्ह्यातील बारड ग्रामपंचायतीने धार्मिक एकतेचा नवा आदर्श घालून दिलाय. बारड गाव हे एक सुखी आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न गाव असून, येथे दरवर्षी केळी, ऊस याबरोबरच भाजीपाला, फुलांच्या उत्पादनात नवनवीन विक्रम होत आहेत. केळीच्या बागा आणि उसाच्या शेतांनी वेढलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे 15 हजार आहे.

बारड गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत. या गावात 15 हिंदू मंदिरं, बौद्ध विहार, जैन मंदिरं आणि मशिदी आहेत. 2018 मध्ये सर्व धार्मिक स्थळांवर 24 तास लाऊडस्पीकर वाजवल्याने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळं संपूर्ण गाव त्रस्त झालं होतं, त्यामुळं गावातील सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती.

त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहेत. सर्वधर्म समभाव करणाऱ्या येथील सर्व धर्मांच्या अनुयायांनी धार्मिक एकतेचं अनोखं उदाहरण घालून दिलंय. येथील जामा मशिदीचे मौलवी मोहम्मद रझा असोत किंवा गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख असोत, सर्वच गावाच्या या निर्णयावर खूश आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा