पुरंदर, दि. १४ जुलै २०२०: जेजुरी (ता. पुरंदर) येथील भारत पेट्रोल पंपासमोर जेजूरी- सासवड रोडवर तीन वाहनांच्या विचित्र अपघातांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाला आपला प्राण गमवावा लागला आहे. अपघातानंतर उपचारा दरम्यान तरूणाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत जेजूरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी २.३० च्या सुमारास जेजुरी शहरातील भारत पेट्रोल पंपासमोर जेजुरी- सासवड रोडवर जेजुरी बाजूकडून सासवड बाजूकडे जाणारा आयशर टेम्पो क्रमांक एम.एच. १२ ईक्यू १४५८ व सासावड बाजूकडून जेजुरीकडे येणारी पिकप गाडी क्रमांक एम. एच. ११ सी एस ०५०८ यांचा अपघात होऊन तीच्या पाठीमागून येणाऱ्या एक्टिवा गाडी क्रमांक एम एच १२ केव्ही ८६९६ हिच्यावर आयशर टेम्पो धडकल्याने एक्टिवा गाडी आयशर टेम्पो त्यासमोरील दोन्ही चाकांमध्ये घुसल्याने ऍक्टिवा चालक जीवनदास उत्तम कोळी( वय २७) रा. जेजुरी, ता. पुरंदर जि.पुणे हा गंभीर जखमी झाला.
जेजुरी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यास समर्थ हॉस्पिटल जेजुरी येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने त्याचा भाऊ अमरजीत उत्तम कोळी यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला आयशर टेम्पो चालक शिवाजी तुकाराम बांदल राहणार झणझणे सासवड ता. फलटण जि. सातारा यांच्याविरुद्ध जीवनदास कोळी यांच्यामुळे यांच्या लहान-मोठे दुखापती व मृत्यू तसेच तीन वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याने भादवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४, ४२७ मोटार वाहन कायदा क्रमांक कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदरच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार बाळासाहेब बनकर हे करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे