गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये गोमांस नेत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल केला

नाशिकमध्ये गोमांस नेत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल केला

नाशिक २५ जून २०२३: नाशिक येथे कारमध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अफान अब्दुल मजीद अन्सारी याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीची घटना ही सिन्नर-घोटी महामार्गावर घडली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक आजूबाजूचा परिसर पिंजून काढतायत.

याबाबत नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर घोटी महामार्गावरील गंभीरवाडीजवळ १० ते १५ अज्ञातांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नासीर शेख व त्याचा एक साथीदार अफान शेख हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून म्हैस व बैलाचे मांस घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते तेंव्हा गोमांसाच्या संशयावरून ही घटना घडली.

सिन्नर तहसीलच्या जवळ, घोटी रस्त्यावर काही लोकांनी त्यांना अडवून कारची झडती घेतली असता कारमध्ये मांस आढळून आले. यावरून पीडित व आरोपीमध्ये वादावादी झाली. त्यानंतर १० ते १५ अज्ञात आरोपींनी, या दोघांवर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version