मुंबईत तरुणीचा चालत्या ट्रेनमध्ये विनयभंग, सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुंबई १५ जून २०२३: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत, परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणीचा चालत्या ट्रेनमध्ये विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. लेडीज कंपार्टमेंटमध्ये २० वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर आठ तासांतच आरोपीला अटक केल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई लोकल ट्रेनच्या हार्बर मार्गावरील, मशीद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान, काल सकाळी हा विनयभंग झाला. पीडित महिला मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असुन ती नवी मुंबईतील बेलापूर येथे परीक्षा देण्यासाठी जात होती. सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनच्या सेकंड क्लासमध्ये प्रवास करताना डब्यात ही मुलगी एकटीच होती, याचा फायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आरडाओरडा सुरू केला. यानंतर आरोपी मस्जिद बंदर स्टेशनवर उतरून पळून गेला.

या घटने नंतर तरुणीने रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडे (आरपीएफ) जाऊन तिची तक्रार दाखल केली. आरपीएफ, जीआरपी, गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यातील एकाला अटक केली. नवाज करीम असे आरोपीचे नाव असून तो रोजंदारी मजूर आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबई महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. मुंबई लोकलमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे. अशा परिस्थितीत या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा