नाशिक, दिनांक ६ सप्टेंबर २०२२ ; नाशिक शहरामध्ये एका तरुणीचे ठरलेले लग्न, तिच्या साखरपुड्याच्या दिवशी नातेवाईकांच्या व्हाट्सअपवर,अश्लील चित्रफित व्हायरल करून मोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील, नाशिकरोड पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीने, तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. नंतर त्याने वेगवेगळ्या हॉटेल्स वर नेऊन तरुणीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्याचे आपल्याकडील छुप्या कॅमेऱ्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ तयार करून तिला शारीरिक संबंधांसाठी धमकवण्यात आले.संबंधित तरुणीवर वारंवार अत्याचार करून, त्याचे अश्लील फोटो नातेवाईकांना व्हाट्सअप वर पाठवल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर संबंधित तरुणीचे ज्या मुलाशी लग्न होणार होते त्यालाही हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले.
विश्वनाथ साईनाथ चव्हाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमा दिवशी फोन करुन तिला बोलवले. परंतु तिने संशयितास नकार दिला. यामुळे रागाला जाऊन त्याने तरुणीला व तिच्या बहिणीच्या नवऱ्यास आणि लग्न ठरलेल्या मुलाच्या व्हाट्सअप वर अश्लील फोटो पाठवले. या प्रकाराने तरुणीचे ठरलेले लग्न मोडले.
अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे, पीडित मुलीने आपल्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनेनंतर वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. संशयीतवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर