गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र सुरु होणार: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र सुरु होणार: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, दि. ७ ऑगस्ट २०२०: सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे लक्ष देत त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी नियमांनुसार बदल लागू केले. अशा परिस्थितीत, मागील दिवसांत सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात आलेली होती. मात्र, आता जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे.

कोरोनाच्या या महामारीच्या काळात कोरोनाच्या उपाययोजना करण्याच्या अटी व शर्तीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी मान्यता दिलेली असून सोबतच याबाबतचे आदेश देखील जारी केले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कंटेन्टमेंट झोन तसेच बफर झोन वगळता जिल्ह्यातील बाकी ठिकाणांतील आधार नोंदणी केंद्राच्या सेवा तसेच ज्या सेवांसाठी मशीन वर बोटांचे ठसे घ्यावे लागतात, अशा सेवा सुरू करता येणार आहेत.

आधार नोंदणी केंद्रावर घेण्यात येणारी खबरदारी:

• आधार केंद्रातील सामग्री, उपकरणे आणि परिसराचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक.
• केंद्र चालक तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी सतत साबणाने हात धुवावेत, तसेच सॅनिटाइजरचा वापर करणे आवश्यक.
• केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे.
• केंद्रात येणाऱ्या नागरिक तसेच केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ मास्कचा वापर करावा. फोटो काढण्यावेळी मास्क काढावा.
• केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
• प्रत्येक आधार नोंदणी किंवा अद्ययावत झाल्यानंतर बायोमेट्रिक उपकरणे सॅनिटाइजर करून वापरावी.
• केंद्रात किमान एक मीटर सुरक्षित अंतर सुनिश्चित करावे. तसेच नागरिकांना योग्य अंतरासह मोकळ्या जागेत बसवावे.
• केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना अपॉइंटमेंट शिवाय परवानगी देऊ नये.
• नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, कफ, श्वासोच्छ्वासाच्या अडचणी असल्यास आधार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावे.
• केंद्रात नागरिकांसाठी असलेली माहिती दर्शनी भागात लावावी.
• केंद्रातील ऑपरेटरने कोवीड १९ च्या हॉटस्पॉट क्षेत्रात जाणे किंवा अशा भागातून प्रवास करणे टाळावे.
• आधार केंद्रात शिबिरे घेऊ नयेत.
• प्रतिबंधित क्षेत्रातील गावात केंद्र चालू करू नये.

अशा प्रकारच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास बांधील राहून आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. तरी, या संबंधित आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता १८६० ( ४५ ) याच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version