अधीश बंगला वाचवण्यासाठी नारायण राणे यांनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई, २२ सप्टेंबर २०२२ : अधिश बंगला अनधिकृत बांधकाम प्रकरणामध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने नुकताच दणका दिला आहे. त्यांची बंगल्याबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे बंगल्यावर हातोडा चालवण्यास आता मुंबई महानगरपालिकेला परवानगी मिळाली. परंतु या प्रकरणात आता नारायण राणे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत याचिका दाखल केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालकीचा मुंबई मधील जुहू येथे अधिश बंगला आहे. येथे अनाधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. राणे यांना याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. नारायण राणेंनी या नोटीशीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने राणे यांना दणका देत अंतिम निर्णय देऊन त्यांची याचिका निकाली काढली आहे. अधिश बंगल्याचे बांधकाम नियमित करण्याची त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

नारायण राणे यांनी समुद्र किनारपट्टी लगत मंजुरीच्या तीनपट बांधकाम केले आहे. यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यांच्या वकिलांनकडून कोर्टाकडे स्टे मागितला होता. त्यालाही कोर्टाने नकार दिला आहे. याप्रकरणी त्यांना दहा लाख रुपयांचा दंड ही ठोठावण्यात आला. या निकालामुळे महानगर पालिकेला बंगल्याचे अवैध बांधकाम तोडण्याला परवानगी दिली आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता नारायण राणे यांनी याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. आता सुप्रीम कोर्टाकडून राणे यांना दिलासा मिळतो का हे पहावे लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा