आदित्य ठाकरेंच शिंदे सरकारवर टीकास्त्र

पुणे, ३ ऑक्टोंबर २०२३ : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या ३६ तासांत ३१ रुग्ण दगावल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही गेल्या २४ तासांत दोन नवजात बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

हाफकिनकडून औषधे घेण्यासाठी निधी नसल्याने औषधांचा पुरवठा होऊ शकलेला नाही, परिणामी औषधांच्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. रुग्णालयात औषधं नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन) घेऊन वणवण फिरावं लागत आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील दोन शासकीय रुग्णालयांमध्ये तब्बल ३९ रुग्णांचा औषधांअभावी मृत्यू झाल्यामुळे विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. औषधांसाठी निधी नसल्याने रुग्णालयांची ही अवस्था झाली असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांमधील नेते राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट एक्सवर (ट्विटर) एक ट्वीट केलं आहे. यामध्ये ठाकरे यांनी म्हटलं आहे की, कालच नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं थैमान झाल्याची भीषण घटना घडली असताना, आज तसाच भयानक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात घडल्याचं समोर येतंय. २ बालकांसह ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेडच्या रुग्णालयातही अजून ७ मृत्यू झाल्याचं समजतंय. हे सगळं भयानक आहे. शासकीय रुग्णालय हा मृत्यूचा सापळा बनलाय का अशी शंका येतेय.

नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील मृत्यूवर नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. नांदेडचे रुग्णालय हे फार मोठे आहे. ५०० बेडच्या त्या रुग्णालयात सध्या ७५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औषधांचा साठा होता, डॉक्टरही होते, पण गंभीर रुग्णांची संख्या जास्त होती म्हणून हा प्रकार घडल्याचे रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून सांगण्यात आल्याचे गिरीश महाजन म्हणाले आहेत. २४ तासांत २४ रुग्ण दगावणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात सविस्तर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली असून अधिकारी तेथे रवाना झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात अहवाल आल्यानंतर नक्की त्यामागचं कारण स्पष्ट होईल असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा