आदिवासींना देवता पूजनीय : डॉ. तुकाराम रोंगटे

पुणे : आदिवासींच्या देव देवता ह्या त्यांचे पूर्वज आहेत. तसेच त्या त्यांना आजही पूजनीय आहेत. आदिवासी हे निसर्ग पूजक असल्याने त्यांच्या देव देवताही निसर्गातील वनस्पती व प्राणी आहेत. त्यांची दैवते ही सजीव स्वरूपातील असतात. अशी माहिती पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांनी दिली.

श्री पंढरीनाथ विद्या विकास संचलित,श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोखरी आणि आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथे दि.२७ ते २८ डिसेंबर २०१९ रोजी “आदिवासी दैवते व परंपरा” या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मराठी विभागप्रमुख व प्रसिद्ध आदिवासी साहित्यीक डॉ. तुकाराम रोंगटे उद्घाटक व बीजभाषक म्हणून आदिवासी साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सुनील घनकुटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. माहेश्वरी गावीत, डॉ. धुमाळ व आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष मा. नामदेव गंभीरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनील घनकुटे यांनी आदिवासी संस्कृती ही जगातील पहिली व महान संस्कृती आहे. भारतातील मूळ रहिवासी असलेला समाज म्हणजे इथला आदिवासी होय. ज्या भागात, परिसरात निसर्गाचे संवर्धन व जतन केले गेले आहे, त्या भागात आजही अदिवासींचीच वस्ती असल्याचे जाणवते. आदिवासींच्या संस्कृतीची जडन-घडण अगदी साधी असून जे काही विनामूल्य व सुलभतेने उपलब्ध होते त्यावर ते आपल्या चालीरीती, हौस-मौज, सन-उत्सव साजरे करतात. आदिवासी निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करत असल्यामुळे त्यांना भूमिजन, धरतीची लेकरे, प्राणीपूजक अश्या विविध नावांनी आजही ओळखले जाते.
आदिवासींच्या दैवतांसंदर्भात बोलताना पुढे ते म्हणाले की, आदिवासींची दैवते ही त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे मुख्यत्वे महादेव, गावदेव, हिरवादेव, नारनदेव, खळयाचा देव, वीर, डोंगऱ्या
देव, कणसरी, कळमजा, सिनला देवी, धोरपडा, रानुबाई, उंबा-या, सतुबाई, यासारख्या देवता ह्या निसर्ग देवता असून आज बहुतांश शिकलेल्या सुशिक्षित असणा-या आदिवासींना स्वतःची दैवते संपूर्ण पणे माहीत नाहीत.ते स्वतःची संस्कृती सोडून इतरांची संस्कृती स्विकारत आहेत. ते त्यांची दैवते पूजत आहेत ही एक खेदाची गोष्ट आहे. असेही त्यांनी सांगितले.
समारोप आदिवासी समाजकृती समिती महाराष्ट्र पुणे यांचे संस्थापक संचालक समाजसेवक सीताराम जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला .या प्रसंगी महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. बाळासाहेब कोळप, पत्रकार मा. कंताराम भवारी, संचालक भीमा कोळप, संतोष कोळप, आदिवासी कृती समितीचे संचालक एकनाथ बुरसे, श्री लक्ष्मण भालेराव, डॉ. अनिल गर्जे, औरंगाबाद, डॉ. कृष्णा भवारी, सांगली, डॉ. कल्याणी शेजवळ, मुंबई, डॉ. प्रकाश धुमाळ, मुंबई, प्रा. राजू शनवार, ठाणे, उपप्राचार्य चेतन वानखेडे आणि महाराष्ट्रातील वेगवेगळया विद्यापीठातील ५० संशोधक, अभ्यासक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मारोती सोनकांबळे तर प्रा. कृष्णा खरात यांनी आभार मानले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा