त्सुनामी म्हणजे पर्यावरणीय आपत्ती. या दरम्यान प्रचंड उंचीच्या आणि अतिवेगवान त्सुनामी किनाऱ्यावर आदळतात. त्याचा प्रभाव किनारी प्रदेशात प्रकर्षाने जाणवतो.
त्सुनामीमुळे किनारी प्रदेशातील लोकांची आर्थिक व जीवित हानी होते. असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. आज वर्ल्ड त्सुनामी डे च्या निमित्ताने याबाबत जाणून घेऊ…
त्सुनामी म्हणजे काय? : समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरीत होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका म्हणजे त्सुनामी होय.
अर्थ काय? : त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ “बंदरातील लाटा” असा आहे. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नव्हत्या, त्यामुळे हे नाव देण्यात आले.
वेग किती असतो? : त्सुनामीची तरंगलांबी 200 कि.मी. व तरंग उंची 1 मीटर असते. त्यावेळी वेग ताशी 800 कि.मी. असतो.
सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती : सन 2004 मध्ये हिन्दी महासागरात निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे सु. 2,30,000 लोक मृत्युमुखी पडले. मानवी इतिहासातील ही एक सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. त्सुनामी या नैसर्गिक संकटाची पूर्वकल्पना करणे शक्य होत नसल्यामुळे येणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन आधीच करणे शक्य नसते.