नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२३ :दिल्ली महापौर पदासाठी आज अखेर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली. ‘आप’च्या उमेदवार शैली ओबेरॉय विजयी झाल्या असून, महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. त्यांनी भाजपा उमेदवार रेखा गुप्ता यांचा ३४ मतांनी पराभव केला. शैली ओबेरॉय या पटेल नगर विधानसभेच्या वॉर्ड क्रमांक ८६ च्या नगरसेविका आहेत.
दरम्यान, तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा एकदा महापौर पदाचा मान एका महिलेला मिळाला आहे. दिल्ली महानगरपालिकेत २०११ साली म्हणजे दहा वर्षांपूर्वी भाजपच्या रजनी अब्बी या महापौर झाल्या होत्या. ४ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर तब्ब्ल ५८ दिवसानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडली.
दिल्ली महापालिकेत २५० जणांची सदस्य संख्या आहे. महापौर पदासाठी १३८ मतांची गरज होती. आम आदमी पक्षाकडे १३४ नगरसेवक, १३ आमदार आणि ३ खासदार अशी सदस्यसंख्या होती. तर भाजपकडे १०४ नगरसेवक, ७ खासदार आणि एक आमदार असे सदस्य होते. महापौर पदाच्या निवडणुकीत शैली ओबेरॉय यांना १५० तर भाजपच्या रेखा गुप्ता यांना ११६ मते मिळाली आहेत. शैली ओबेरॉय यांनी ३४ मतांनी रेखा गुप्ता यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या ९ सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.