मुंबई : दहावीप्रमाणेच आता बारावीच्या गुणपत्रिकेवरील नापास किंवा अनुत्तीर्ण शेरा पुसला जाणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी पात्र असा शेरा देण्यात येणार आहे.
त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
दहावीच्या गुणपत्रिकेवरून नापास, अनुत्तीर्ण किंवा ‘फेल’ हे शब्द तीन वर्षांपूर्वी हद्दपार करण्यात आले.
आता बारावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण झाल्याचा उल्लेख न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
त्याऐवजी कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख गुणपत्रिकेवर करण्यात येणार आहे. तीन किंवा जास्त विषयात अनुुत्तीर्ण झालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य सेतू अभियानात सामावून घेण्यात येणार आहे.
त्या अनुषंगानं या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रावर अनुत्तीर्ण, असा उल्लेख न करता कौशल्य विकासास पात्र, असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव कौशल्य विकास विभागानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाला दिला आहे.