चिंचवड, १८ जानेवारी २०२३ : पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले आहेत. हेल्मेटचा वापर न करणे, तसेच वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन यमराज करीत आहेत. राज्यात शनिवारपासून (ता. १४) ते शनिवारपर्यंत (ता. २८) रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. याअंतर्गत हा उपक्रम चिंचवड वाहतूक पोलिसांनी राबविला आहे.
प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. किमान आपल्या कुटुंबाचा विचार करून वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड हे मेट्रो शहर आहे. लाखो वाहने शहरात असून अनेकांचा वाहतूक नियमांचे पालन न केल्याने मृत्यू होतो. सिग्नल न पाळणे, ओव्हर स्पीड, हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट अशी वाहतूक नियमांची पायमल्ली वाहनचालक करतात. वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी चिंचवड चौकात चक्क यमराज अवतरले आणि त्यांनी ‘नियम पाळा अन्यथा माझ्यासोबत चला’ असे म्हणत नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्यासह इतर वाहतूक पोलिस कर्मचारी होते. सिग्नलवर थांबून प्रत्येक वाहनचलकांना नियम पालन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिस करीत होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील