नाशिक, १८ ऑगस्ट २०२०: संदीप विद्यापीठ, नाशिक येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.
देशावर कोरोना महामारीच्या संकट ओढावलेले असताना संदीप विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना व पालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. संदीप विद्यापीठाच्या परिपत्रकातून विद्यार्थ्यांना ३१ जुलै च्या आधी ५०% शुल्क भरण्यास सांगितले गेले. परंतु विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण शुल्क अन्यथा ५०% शुल्क असा पर्याय सोडून चार टप्प्यात शुल्क भरण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हता. त्याचबरोबर ३१ जुलै नंतर १६ ऑगस्ट पर्यंत शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रति दिवस १०० रु. दंड आकारण्यात येणार असल्याचे नमूद केले होते आणि १६ ऑगस्ट नंतर संबंधित विद्यार्थ्यांचे नाव प्रवेश यादीतून वगळण्यात येणार आणि त्या विद्यार्थ्यांना २००० रु. शुल्क भरून नवीन प्रवेश प्रकिया करण्यास सांगितले गेले होते.
ह्यावर अभाविपकडून दि. ११ रोजी विद्यापीठाला निवेदन देण्यात आले होते. निवेदनात ‘२ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास अभाविप विद्यार्थी हितासाठी आंदोलन करेल’ असा इशारा देण्यात आला होता, परंतु विद्यापीठाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आला नाही.
संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बेबंदशाही विरोधात संदिप विद्यापीठ परिसरात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले . यावेळी संदीप विद्यापीठाने विद्यार्थ्यां विरोधात पोलीस बळाचा वापर व बाउन्सर सिक्युरिटी गार्डचा वापर करत विद्यार्थी व विद्यार्थिनीवर धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आज अनेक विद्यार्थी व अभाविपचे कार्यकर्ते जखमी झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका घेतली. शेकडो विद्यार्थ्यांना गेटवरच आडवून ठेवण्यात आले.
आंदोलन अजून आक्रमक होत आहे असे बघून संदीप विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. व शेवट संदीप विद्यापीठ प्रशासनाला अभाविप व विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलं. अवैधरित्या प्रतिदिन शंभर रुपये दंड वसुली व री-रजिस्ट्रेशन फीज २००० रुपय विद्यापीठाने पूर्णतः रद्द केली आहे.
ह्यावेळी संदीप विद्यापीठाचे विद्यार्थी तोसिफ खान, नासीर चौधरी, जयेश कळमकर , सुचित आवारे , कृष्णा राठी , सौरभ घाडगे, मुजफ्फर शेख , भूपेश नागरे ,विश्वास सिंग यांच्यासह १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
संदीप विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगर सहमंत्री गौरी पवार सिद्धेश खैरनार नगर सहमंत्री ओम मालुंजकर , सौरभ धोत्रे ,तेजल चौधरी , प्रसाद जोशी , दुर्गेश केंगे, सागर जंजाळे , प्रथमेश नाईक हे अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
“अखेर संदीप विद्यापीठ प्रशासनाला अभाविप व विद्यार्थ्यांच्या मागण्या समोर झुकावे लागले. विद्यार्थ्यांना चार किंवा त्यापेक्षा अधिक टप्प्याने फी भरण्यासाठी पर्याय उपलब्ध करून द्यावा यासाठी चार दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे . सकारात्मक निर्णय न झाल्यास अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल” असा इशारा अभाविप महानगर सहमंत्री गौरी पवार यांनी दिला आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड