शैक्षणिक शुल्क माफीसह शैक्षणिक प्रश्नांबाबत मागण्यांसाठी अभाविपचे राज्यमंत्र्यांना निवेदन

उस्मानाबाद, २५ सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांकडून रद्द केलेल्या परीक्षांचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र इथं राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन  दिले.
       
       
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी, स्वायत्त (खासगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठीत करण्यात यावी, महाराष्ट्रातील काही शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून द्यावी, शासकीय अभियांत्रिकी (ॲटोनॉमस) महाविद्यालयांचे शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे, असे या निवेदनाद्वारे म्हटले गेले आहे.

या प्रश्नांना घेऊन अभाविप महाराष्ट्रभर विविध विद्यापीठातील कुलगुरू, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व पालकमंत्री यांना भेटून विद्यार्थ्यांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर मांडत आहेत. परंतु या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा. अन्यथा अभाविपच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
 
या मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांना दिनांक 24 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने विद्यापीठ उपकेंद्र परिसरात देण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, समर्थ आगळे, ऋषिकेश साळुंके, नितेश कोकाटे पृथ्वीराज महामुनी, अथर्व पाटील, तुषार भातलवंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:  प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा