जैन संस्कृतीला समर्पित ‘अभय प्रभावना’ संग्रहालयाचे पुण्यात उद्घाटन

पुणे, ६ नोव्हेंबर २०२४ : जैन तत्त्वज्ञान आणि भारतीय वारसा यांना समर्पित असलेल्या ‘अभय प्रभावना’ संग्रहालयाचे मोठ्या उत्साहात नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या प्रतिष्ठित संस्थेची स्थापना अमर प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी केली आहे. भारतीय अध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठीच्या प्रवासातील हे संग्रहालय महत्त्वपूर्ण असा टप्पा आहे. पुण्यातील मावळ येथील इंद्रायणी नदीच्या निसर्गरम्य काठावर पारवडी गावात हे संग्रहालय वसलेले आहे. या संग्रहालयाच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवाय मेवाडचे महाराज कुमार लक्ष्यराज सिंह; पद्मभूषण डी आर मेहता, बीएमव्हीएसएसचे संस्थापक व गांधीवादी नेते पद्मभूषण अण्णा हजारे आदी सन्माननीय पाहुणे उपस्थित होते. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीमती मनेका गांधी याही उद्घाटनाला उपस्थित होत्या. पद्मश्री गुरुदेवश्री राकेशजी (धरमपूर), पद्मश्री आचार्य चंदना जी महाराज (वीरायतन), आणि परमपूज्य दलाई लामा यांचे आध्यात्मिक प्रतिनिधित्व करणारे परमपूज्य सिलिंग टोंगखोर रिनपोचे यांचीही उपस्थिती लाभली होती.

जैन मूल्यांची सखोल समज निर्माण करणे, भारतीय मूल्य प्रणालीवर आणि समकालीन समाजात जैन मूल्यांची प्रासंगिकता यावर आधारित असे हे संग्रहालय आहे. हे संग्रहालय ३.५ लाख चौरस फूट क्युरेटेड आणि वातानुकूलित जागेत पसरलेले असून या संग्रहालयात ३५० पेक्षा अधिक अद्वितीय कलाकृतींसह ३० विशेषतः डिझाइन केलेल्या गॅलरी आहेत, ज्यातून सामाजिक स्तरावर सुरक्षा, उत्पादकता, समृद्धी आणि वैयक्तिक स्तरावर करुणा, मुक्त विचारसरणी, आणि नैतिक जीवन या जैन मूल्यांचे सार सादर केले गेले आहेत. ५० एकर (वीस हेक्टर) जागेवर पसरलेले हे संग्रहालय हाय-टेक ऑडिओ-व्हिज्युअल्स, ॲनिमेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी, इमर्सिव अनुभव आणि परस्परसंवादी प्रणालीने समृद्ध आहे. जैन तत्त्वज्ञानातील जटिल आणि आध्यात्मिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ३५० हून अधिक कलाकृती, शिल्पे आणि भव्य प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत. या संग्रहालयात ३५ प्रोजेक्टर, ६७५ ऑडिओ स्पीकर्स, २३० एलईडी टीव्ही/किओस्क, ८००० लाइटिंग फिक्स्चर, ६५० टन एचव्हीएसी लोड, ५ किमीपेक्षा अधिक एचव्हीएसी डक्टिंग आणि जवळपास २ एमव्हीए चे इलेक्ट्रिकल डिमांड लोड यांचा समावेश आहे.

या संग्रहालयाच्या प्रेरणेविषयी बोलताना अभय फिरोदिया म्हणाले की, “अभय प्रभावना’ हे श्रमण आणि जैन परंपरेच्या सखोल मूल्यांचे सन्मान करणारे संग्रहालय आहे. या मूल्यांचा प्रभाव हजारो वर्षांपासून भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक गाभ्यात आहे. हे संग्रहालय शिक्षण, व्यवसायिकता, आणि नीतिमत्तेच्या तत्त्वांचा प्रचार करत केवळ संकल्पना म्हणून नव्हे तर सामाजिक मूल्य म्हणून प्रतिबिंबित करते. हे व्यक्तींना संतुलित आणि उद्देशपूर्ण जीवनासाठी मार्गदर्शन करेल. हे संग्रहालय लोकांना जैन धर्माद्वारे व्यक्त केलेल्या भारतीय सभ्यतेच्या आदर्श दहा मूल्यांचा शोध घेण्यास आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी प्रेरणा देईल.” हे संग्रहालय २२०० वर्षे जुन्या पाले जैन लेण्यांजवळ पुण्यातील ऐतिहासिक भूमीत असून अभय प्रभावना संग्रहालय पुण्याला जागतिक सांस्कृतिक केंद्र बनण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हे संग्रहालय दररोज २००० हून अधिक अभ्यागतांना आकर्षित करेल अशी अपेक्षा, फिरोदिया यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट पुणे प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा