जळगाव, २ नोव्हेंबर २०२०: राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तसेच एकनाथ खडसे आणि गाडीतील सर्व व्यक्ती सुखरूप आहेत. खडसेंच्या कारचे टायर फुटून जळगावमध्ये हा अपघात झाला. अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे येत असताना एकनाथ खडसे यांच्या गाडीला हा अपघात झाला.
एकनाथ खडसे हे आज (१ नोव्हेंबर) अमळनेर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते गाडीने जळगावकडे येत होते. धरणगाव जवळ असतानाच अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.
“आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडीचा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही,” अशी माहिती खडसे यांनी दिली.
याआधी, एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत एकाच गाडीने नंदुरबार दौरा पूर्ण केला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे अनिल देशमुख यांच्या हस्ते श्री नारायण मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळेस गृहमंत्र्यांसोबत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे