नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2022: : NSE च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यन यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एक्सचेंजचे MD म्हणून ‘हिमालयात राहणाऱ्या एका योगीच्या आदेशानुसार नियुक्ती केली. बाजार नियामक सेबीच्या आदेशात हे सांगण्यात आलं आहे.
सेबीच्या आदेशात असं म्हटलंय की रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना अनेक वेळा मनमानी पगारवाढ दिली, परंतु त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी कोणताही पुरावा नाही.
सेबीच्या आदेशात या गोष्टीही आल्या समोर
सेबीने शुक्रवारी दिलेल्या आदेशात या गोष्टी समोर आल्या आहेत. नियामकाने रामकृष्ण आणि इतरांविरुद्ध आदेश पारित केलाय. आदेशात म्हटलंय की, रामकृष्ण यांनी एनएसईच्या काही आर्थिक आणि व्यावसायिक योजना, लाभांशाशी संबंधित बाबी, आर्थिक निकाल आणि काही अन्य गोपनीय माहिती योगी यांच्याशी शेअर केली. एवढंच नाही तर एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनाबाबतही त्यांनी योगी यांच्याशी चर्चा केली.
घेत आहे 20 वर्षांपासून सल्ला
रामकृष्ण योगींना “सिरोमनी” असं संबोधतात आणि गेल्या 20 वर्षांपासून सर्व प्रकारच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींवर त्यांच्या मताच्या आधारे निर्णय घेत आहेत. रामकृष्ण एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSE चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO होते.
190 पानांचा आदेश
सेबीने आपल्या 190 पानांच्या आदेशात म्हटलंय की, रामकृष्ण यांनी योगींच्या सांगण्यावरून सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली. त्यामुळं सुब्रमण्यम यांना बरेच अधिकार देण्यात आले होते.
अशा प्रकारे करण्यात आली सुब्रमण्यम यांची नियुक्ती
सुब्रमण्यम यांना एप्रिल 2013 मध्ये NSE मध्ये मुख्य धोरण सल्लागार म्हणून रुजू होण्याची ऑफर देण्यात आली होती. त्यांना 1.68 कोटींचं वार्षिक पॅकेज ऑफर करण्यात आलं होतं. याआधी ते बाल्मर आणि लॉरीमध्ये मिडल लेव्हल मॅनेजमेंटमध्ये कार्यरत होते आणि मार्च 2013 मध्ये त्यांचं वार्षिक पॅकेज 15 लाख रुपयांपेक्षा कमी होतं. याशिवाय त्यांना भांडवली बाजाराचा अनुभव नव्हता.
एप्रिल 2014 मध्ये त्यांचं वार्षिक पॅकेज 1.68 कोटी रुपयांवरून 2.01 कोटी रुपये करण्यात आलं. एप्रिल 2015 मध्ये त्यांचं वार्षिक पॅकेज 3.33 कोटी रुपये करण्यात आलं. यासह त्यांची ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आणि MD चे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2016 मध्ये त्यांचं पॅकेज 4.21 कोटी रुपये झालं.
आता भरावा लागंल इतका दंड
सेबीने कारभारातील त्रुटीबद्दल रामकृष्ण यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. यासोबतच एनएसई, सुब्रमण्यम आणि एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ रवी नारायण यांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. याशिवाय तत्कालीन मुख्य नियामक अधिकारी आणि अनुपालन अधिकारी व्ही.आर. नरसिंहन यांना 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही देखील कारवाई
रामकृष्ण आणि सुब्रमण्यम हे कोणत्याही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेशी किंवा SEBI कडं नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी तीन वर्षांसाठी संबंधित राहू शकत नाहीत. याप्रकरणी नारायण यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे