बारामती, ५ सप्टेंबर २०२० : बारामती शहरातील कृष्णा जाधव या दोन वर्षांपूर्वी गाजलेल्या खुन प्रकरणी फरारी आरोपीला अटक करण्यात बारामती शहर पोलीसांना यश आले आहे. आरोपी मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव (वय २७,रा तांदुळवाडी वेस,बारामती)असे फरारी आरोपीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक औदुुंबर पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.
या सर्व प्रकरणाची हकीकत अशी की, कृष्णा जाधव खुन प्रकरणातील २१ आरोपींनी जाधव यास मोठ्या रकमेची खंडणी मागितली होती. खंडणी दिली नाही म्हणून ५ नोव्हेंबर २०१८ रोजी कृष्णा उर्फ नाना महादेव जाधव( वय ५५ वर्ष रा. कैकाडी गल्ली ,नेवसेरोड ,बारामती ) बारामती हॉस्पीटल प्रा.लि.बारामती येथे एका रुग्णाला पाहण्यासाठी जात होते. यावेळी पाळत ठेवून रस्त्यामध्ये त्यांच्यावर धारदार हत्याराने मानेवर, गळयावर, डोक्यावर वार करून जागीच ठार मारण्यात आलेले होते. त्यांची पत्नी सपना कृष्णा जाधव यांनी फिर्याद दिली होती.
त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात ७७९/२०१८ भादविक. १२०(ब),३८६, ३८७,३०२,३४. प्रमाणे एकुण २१ आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात ४ अल्पवयीन आरोपी होते. आरोपींना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे वाढीव कलम लावून मोक्काची कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी या प्रकरणी तपास केला आहे.
आज पर्यंत गुन्ह्यातील २१ आरोपींपैकी १७ आरोपीस अटक करून मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या गुन्ह्यातील फरार आरोपी मोठा बिटया उर्फ सचिन रमेश जाधव हा फरार होता. तो सोलापुर शहरात सलगरवस्ती परीसरात राहत असल्याची माहीती सोलापुर शहर पोलीसांनी बारामती शहर पोलिसांना वायरलेस वरून काळविल्यानंतर शहर पोलीसांनी सलगरवस्ती पोलीस ठाणे यांच्या मदतीने आरोपी सचिन जाधव यांस ताब्यात घेतले आहे.
आरोपीस मोक्का न्यायालयाने ६ दिवस पोलीस कोठडी सुनावली असून, आरोपी जाधव याच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात ८ वेगवेगळे गुन्हे दाखल अाहेत , आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी