दौंड, १४ ऑक्टोबर २०२०: दौंड तालुक्यातील मळद येथील पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ सहा महिन्यापूर्वी ट्रकचालकाचा खून झाला होता. याप्रकरणासह खून, दरोडा, मोक्का व तीन जबरी चोरी अशा पाच गंभीर गुन्ह्यात फरार असणाऱ्या एका आरोपीला बुधवार (दि. १४) अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
मळद येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील हाॅटेल वृंदावन समोर 30 मार्च 2020 रोजी रात्री दीडच्या सुमारास ट्रकचालक काशिनाथ रामभाऊ कदम (वय 55, रा. ढोकी, ता. कळंब, जि.उस्मानाबाद) यांचा पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी छातीवर चाकूने वार करुन खून केला होता. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम, वाहनचालक परवाना, मोबाईल चोरून नेला होता. तसेच दुसर्या टेम्पोचा क्लीनर महंमद मेहबुब पठाण (रा. उस्मानाबाद) याचा मोबाईल व चालक अल्ताफ खैयुम पटेल यांच्याकडील रोख रक्कम, वाहन चालविण्याचा परवाना व पाकीट चोरुन नेले होते. सदर घटनेत ट्रकचालकाचा काशिनाथ कदम उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर टेम्पो क्लीनर महंमद पठाण जखमी झाला होता. याबाबत ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता.
या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 5 आरोपी निष्पन्न करून त्यांचेकडून एकूण 2 दरोडे, 5 जबरी चोऱ्या, 2 चोरी असे 9 गुन्हे उघडकीस आणले होते. सदर गुन्हयात यापूर्वी आरोपी गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22, रा.बोरावकेनगर, ता. दौंड, जि.पुणे), समीर उर्फ सुरज किरण भोसले (वय 19 रा . गोपाळवाडी – पाटस रोड, ता. दौंड, जि. पुणे), देवगण अजिनाथ चव्हाण (वय 23, रा. बोरावकेनगर, ता. दौंड, जि.पुणे), अक्षय कोंडक्या चव्हाण (वय 25, रा. लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे) यांना अटक केली होती. मात्र नेपच्युन उर्फ नेपश्या पिजारो काळे (वय ३४ रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा फरारी झाला होता. तेव्हापासून पोलिसांचे पथक या अटल गुन्हेगाराच्या मागावर होते. हा आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने सापडत नव्हता. मात्र आज (ता. १४) हा आरोपी मिरजगाव ता. कर्जत जि.अहमदनगर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्या ठिकाणी पथकाने वेशांतर करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी नेपच्यन उर्फ नेपश्या काळे याला अटक केली. सदर आरोपीची वैद्यकिय तपासणी करुन त्यास दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, पोलिस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत, श्रीगोंदा पोलिस अंकुश ढवळे यांच्या पथकाला आरोपीला अटक करण्यात यश आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी :रिजवान मुलाणी