मुंबई १७ मे २०२३ : कामाची तंतोतंत वेळ पाळण्यासाठी बिग बी उर्फ अमिताभ बच्चन बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. दोन दिवसांपूर्वी बिग बी यांना ट्रॅफिक जाम मुळे शुटिंगच्या सेटवर पोहचायला उशीर होत होता. अशावेळी त्यांनी एका बाईकवाल्या अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली आणि वेळेत ते शूटिंग सेटवर पोहोचले. तर दुसरीकडे अनुष्का शर्मा तिच्या बॉडीगार्डसह बाइक राइड करताना दिसली. पण यावेळी दोघांनीही हेल्मेंट घातले नव्हते, त्यामुळे त्यांनी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या आहेत. यावर आता मुंबई पोलिस कारवाई करणार आहेत.
बिग बी यांनी सोमवारी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले. मुंबईतील ट्रॅफिक समस्येबद्दल अमिताभ यांनी स्वतः हा फोटो शेअर करत तक्रार केली होती. त्यांनी लिहिले होते की, ‘मला बाइकवरून सोडणाऱ्या बाइक राइडरचे आभार, टोपी, शॉर्ट आणि पिवळा शर्ट घातलेल्या व्यक्तीचे मनापासून आभार, मी तुम्हाला ओळखत नाही. परंतु तुम्ही मला इच्छित स्थळी वेळेवर पोहोचवले. वाहतूक कोंडीतून मला तुम्ही वाचवले त्यासाठी तुमचे मनापासून आभार’
बिग बी यांचा फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी हेल्मेट न घातल्याबद्दल बिग बींवर आक्षेप नोंदवला. एकाने कमेंट मध्ये लिहिले, ‘सर हेल्मेट कुठे आहे?’ तर एकाने मुंबई पोलिसांना अमिताभ यांचा फोटो टॅग करत लिहिले, मुंबई पोलिसांनी कृपया दखल घ्यावी, हेल्मेट न घातल्याने त्यांनी वाहतुकीचे नियम तोडल्याचे दिसते, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मला आशा आहे की पोलिस कारवाई करून, पोलिसांसाठी सर्व नागरिक समान आहेत हे दाखवून देतील.’
नेटकऱ्यांनी अनुष्कालाही ट्रोल करताना लिहिले की, ‘मॅडमने आणि तिच्या बॉडीगार्ड हेल्मेट घातलेले नाही.’ ‘मुंबईत हेल्मेटची गरज नसते का?’ एकाने लिहिले, ‘श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांसाठी हेल्मेट न घालण्यावर दंड नाही का?’ ‘पोलिसांनी या लोकांकडून मोठा दंड वसूल करावा.’
आता मुंबई पोलिस दोघांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आम्ही हे प्रकरण वाहतूक पोलिसांना दिले आहे, पुढील कारवाई ते करतील’.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे