मोहोळ, दि.१४मे २०२०: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लॉकडाऊन चालू आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हाबंदी असताना कायद्याची व शासकीय नियमांची पायमल्ली करून आमदार यशवंत माने पुणे जिल्ह्यातून मोहोळ तालुक्यात येत आहेत.
कोरोनाबाधित गावांना ते भेटी देत असल्यामुळे त्यांचेवर कारवाई करून त्यांना क्वारंटाईन करावे, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे आणि संजीव खिलारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार यशवंत माने हे १२ मे रोजी जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली करून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आले. तालुक्यातील पाटकूल, ढोकबाभूळगाव व सावळेश्वर या गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्या गावात जाऊन त्यांनी भेटी दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि सर्वच खात्याचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वास्तविक पाहता जिल्ह्याच्या बाहेरून येण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याच बरोबर स्वतःच्या आरोग्याची तपासणी देखील करणे आवश्यक आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: