इंदापूर, दि. २० मे २०२०: इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.राजेश मोरे यांच्यावर अखेर महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालयाने कारवाई केली असून त्यांच्याकडे असणारा इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक पदावरून देखील बुधवार दि.२० मे रोजी पुढील आदेश येईपर्यंत उचलबांगडी करण्यात आली आहे.
डॉ. राजेश मोरे हे पुणे जिल्हयातील इंदापूर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकिय अधिक्षक पदी रूजू आहेत.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून डाॅ.मोरे यांच्या बद्दल नागरिकांमधून आरोग्य विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
ते जाणीवपूर्वक आपल्य कर्तव्यात कसूर करत असल्याचा ठपका नागरिकांनी त्यांच्यावर ठेवला होता.
त्यांच्या कामकाजाबाबत आरोग्य विभागास अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडील वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय या पदाचा कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय इंदापूर यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याबाबत डाॅ. साधना तायडे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी लेखी आदेश दिला आहे.
मंगळवार दि.१९ मे रोजी डाॅ.राजेश मोरे यांनी इंदापूर जवळील सी.सी.सी.(कोरोना केअर सेंटर) उपचार घेणाऱ्या मायलेकींना सेंटर सोडून काही शारिरिक चाचण्यांसाठी सी.सी.सी.केंद्रातून थेट इंदापूर शहरात फिरवल्याने नागरिकांमध्य प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना इतरांच्या आरोग्याची चिंता नाही का? असा सवाल शहरातील नागरिकांमधून विचारला जात होता. त्यामुळे इंदापूर शहरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले होते.
दि.१७ मे पासून कोरोनाग्रस्त रुग्णांवर इंदापूर शहरानजीक असणाऱ्या डाॅ.कदम गुरूकुल मध्ये उभारण्यात आलेल्या सी.सी.सी.(कोवीड केअर सेंटर) केंद्रात उपचार सुरु आहेत. मात्र मंगळवार दि.१९ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास या दोन्ही रुग्णांस इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात ई.सी.जी.व रक्त तपासणी साठी रुग्णवाहीकेतून आणण्यात आले.
तसेच त्यांच्या वरील चाचण्याही करण्यात आल्या. नंतर दुपारी तीनच्या दरम्यान खाजगी दवाखान्यात त्यांचा एक्स् रे देखील काढण्यात आला. दरम्यान यावेळी या रुग्णांनी एन.९५ मास्क न वापरता साधा मास्क लावलेला होता. असे गंभीर प्रकार केल्यानंतर अनेक माध्यमातून या प्रकाराला वाचा फोडली होती.
त्यानंतर केवळ चोवीस तासांच्या आतच ही कारवाई झाल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे