सातारा ,२५ एप्रिल २०२० :लोणंद शहरात बुधवार दि.२३ व गुरुवार दि.२४ रोजी, भाजी विकताना मास्क न वापरणाऱ्या २९ भाजी विक्रेत्यांवर, नगरपंचायतच्या वसुली विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नगरपंचायतीच्या दि.२४ च्या सुधारीत आदेशान्वये, मास्क न वापरल्यास, पहिल्या वेळी ५०० रु. दंड व दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोणी थुंकल्यास, पहिल्या वेळी १००० रु. दंड व दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचा भंग केल्यास नागरिकांना, पहिल्या वेळी ५०० रु. व दुकानदारांना १००० रू. दंड तर दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंध केलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावर भाजीपाला व फळे विक्रेते यांनी व्यवसाय केल्यास पहिल्या वेळी ७००/- रु. दंड तर दुसऱ्या वेळी फौजदारी कारवाई करण्यात येईल असे लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी सांगितले आहे. तसेच सर्व नागरिकांनी या सुचनांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.