फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील सूरज बोडरे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई

फलटण, १५ फेब्रुवारी २०२३ : साखरवाडी (ता. फलटण) येथील सूरज बोडरे व त्याच्या १२ साथीदारांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.

याविषयी अधिक माहिती अशी, की समीर शेख, पोलिस अधीक्षक, सातारा व बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करून दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरिता संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. वर्ष २०१० मध्ये फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती झाली आहे. मागील १२ वर्षांमध्ये मोक्का कायद्याअंतर्गत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गतची ही पहिलीच कारवाई झालेली आहे.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस निरीक्षक श्री. धन्यकुमार गोडसे यांनी स्वीकारल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये राजकीय झूल पांघरुण तालुक्यातील गोरगरीब जनतेला फसवून त्यांची लुबाडणूक करणाऱ्या दिगंबर रोहिदास आगवणे व त्यांच्या इतर सहा साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर काही दिवसांतच साखरवाडी भागामध्ये व्यावसायिकांना लक्ष्य करून दहशत पसरविणाऱ्या सूरज वसंत बोडरे व त्याच्या इतर १२ साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.

दरम्यान, सूरज वसंत बोडरे व त्याच्या १२ साथीदारांनी खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, अपहरण, जबर दुखापत घडवून आणण्याच्या मारामारी अशा प्रकारचे गुन्हे करून फलटण तालुक्यातील साखरवाडी भागामध्ये दहशत निर्माण केली होती. टोळी प्रमुख सूरज वसंत बोडरे याने स्वत:च्या व टोळीच्या आर्थिक फायद्याकरिता प्रामुख्याने व्यावसायिकांना लक्ष्य केले होते. त्यासाठी फलटण तालुक्यात दहशत पसरविण्यासाठी त्याने इतर टोळी सदस्यांना एकत्र करून वरीलप्रमाणे गुन्हे करून दहशत निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. धन्यकुमार गोडसे यांनी सदर टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाईकरिता मा. पोलिस अधीक्षक, सातारा यांच्यामार्फत मा. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्काअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. नमूद प्रस्तावास मा. श्री. सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली असून नमूद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावून या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. तानाजी बरडे, फलटण उपविभाग हे करीत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा