मुंबई, ७ ऑगस्ट २०२० : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटताना हलगर्जीपणा करणाऱ्या तसंच मंजुर पीक कर्ज कमी प्रमाणात देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.
सरासरी ५१% पेक्षा कमी खरीप पीक कर्ज वाटप असलेल्या राज्यातल्या १२ जिल्ह्यांची आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. सरासरीपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झालेल्या जिल्ह्यांतल्या जिल्हाधिका-यांनी बँकांचा गावनिहाय आणि शाखानिहाय आढावा घेऊन आपापल्या जिल्ह्याचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याचं नियोजन करावं आणि याबाबतचा अहवाल सहकार विभागाला सादर करावा असे निर्देशही पाटील यांनी दिले.
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी ऑक्टोबर २०१९ पासून कर्जमाफीची रक्कम मिळालेल्या तारखेपर्यंत व्याजाची रक्कम वसूल करु नये अशा सूचना सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी यावेळी दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी