शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित कार्यान्वित करा: भारती दुधाळ

इंदापूर, दि.१४ मे २०२०: पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने २ कोटीहून अधिक निधी खर्च करून उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र मागील तीन चार वर्षापासून धुळ खात पडलेले आहे.

इंदापूर तालुक्यातील सर्वात मोठे व सुसज्ज असलेले शेळगाव(ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेली पद भरती करून त्वरित कार्यान्वित करा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार (दि.१२) रोजी आयोजित करण्यात आली होते. त्या सर्वसाधारण सभेत सोशल मीडियाव्दारे व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सदस्या भारती मोहन दुधाळ यांनी गटातील विविध विकासकामाबरोबरच प्रामुख्याने शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी त्वरित कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आरोग्य विभागाचे सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केले आहे.

यावेळी सदस्या भारती दुधाळ यांनी दिलेल्या माहिती नुसार शेळगाव येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्रास २ कोटी हून अधिक चा निधी खर्चन उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र सन २०१६- २०१७ मध्ये बांधकाम पूर्ण होऊन आज रोजी ही ते कर्मचारीविना धुळखात पडलेले आहे.

शिवाय शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट अ २ , आरोग्य सहाय्यक१, सहाय्यक परिचारक१ , आरोग्य सहाय्यक १, प्रयोगशाळा तज्ञ १, औषध निर्माण अधिकारी १, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक१, परिचर ४ व सफाईगार १ असे एकूण १५ विविध पद भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली होती, तरी अद्यापही तीन चार आरोग्य कर्मचारी सोडले तर अन्य वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची भरती केलेली नाही. त्यामुळे शेळगाव, कडबनवाडी, व्याहाळी, शिरसट्वाडी, गोतोंडी सह अन्य भागातील नागरिकांची आरोग्यविषयक मोठी गैरसोय होत आहे. यामुळे त्वरित शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास पद भरती करून नागरिकांसाठी आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यान्वित करावे अशी मागणी दुधाळ यांनी केली आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर जिल्हातून अन्य ठिकाणावरुन आलेल्या शेळगाव परिसरातील २८७ लोकांना घरी विलगीकरण केले आहेत. त्या लोकांना या प्राथमिक आरोग्य केंद्रास विलगीकरण करावे तसे मोठे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे कोरोना संदर्भात विलगीकरण कक्ष म्हणून जाहीर करावे.अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा