दुबई २० फेब्रुवारी २०२४ : परदेशात राहणाऱ्या नव्या पिढीतील मराठी मुलामुलींना आपल्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराज यांची नव्याने ओळख व्हावी. वारंवार भारतात जाणे शक्य नसल्याने आपला वारसा त्यांच्यापर्यंत येथे दुबई मध्ये पोचवावा म्हणून प्रथा आणि त्रिविक्रम ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२४ या शिवजयंतीचे औचित्य साधून “प्रथा शिवसृष्टी २०२४ – शिवजयंती उत्सव” या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याचे आकर्षण ठरले ‘दुर्ग प्रदर्शन’, ज्यामध्ये टाकाऊ वस्तूंचा पूनर्वापर करून स्वराज्यातले १० प्रमुख दुर्ग अगदी हुबेहूब साकारले. श्री.प्रमोद मोर्ती यांनी समकालीन संदर्भाचे दाखले घेऊन रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांचे प्रदर्शन, कल्चरल जिथे लहान मोठ्यांनी स्वराज्य काळातील पोशाख परिधान करून छायाचित्रे काढून घेतली, होनोपॉली हा क्वेस्ट गेम खेळला गेला, प्रथा किड्स प्ले एरिया जिथे लहान मुलांना मावळ्यांची चित्रे रंग भरण्यासाठी दिली गेली. अशा विविध उपक्रमांसोबत स्थानिक कलाकारांनी आपापल्या कला जसे कि एकपात्री, भारूड, गायन सादर केले आणि उपस्थितांनीही त्यांना उत्तम दाद दिली. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी खास पुण्याहून येऊन या सोहळ्यास आपली उपस्थिती लावली. त्यांच्या स्वागतासाठी त्रिविक्रम ढोल ताशा व बालमित्र ढोल ताशा पथक यांनी विशेष दर्जेदार वादन केले.
संयुक्त अरब अमिरातीमधील मराठी भाषिकांनी पहिल्यांदाच असा एवढा अभूतपूर्व सोहळा अनुभवला की ज्यामध्ये फक्त लहान मुलांनाच नाही पण मोठ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला आणि आपण खूप काही घेऊन जात आहोत अशी भावना व्यक्त केली. या सोहळ्याला दिवसभरात तब्बल १८००-२००० शिवप्रेमींची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून श्री सुशिलदादा मोझर, श्री. राहुलजी तुळपुळे, श्री. सुनिलजी मांजरेकर, श्री. गिरीशजी पंत देखील उपस्थित होते आणि त्या सर्वांनी या सोहळ्याचे भरभरून कौतुक केले आणि पुढील वर्षी यांच्याहून दिमाखदार सोहळा आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनी प्रथाच्या या उपक्रमातून मुलांना आपला इतिहास सांगण्याचा एक उत्तम मार्ग मिळाल्याचे आणि मुले खुप आनंदी होऊन घरी जात आहेत हे देखील आवर्जून सांगितले.
मृणाल कुलकर्णींनी या सर्व कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केलेच, पण त्याही पुढेही जाऊन त्या म्हणाल्या की “मी आजवर भारतभरात अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिले आहे, परंतु यासारख्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील पद्धतीने आयोजित केलेला कार्यक्रम आणि तो ही भारताबाहेर हे मात्र पहिल्यांदाच पहात आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने मुलांसाठी “किल्ला स्पर्धा” देखील घेण्यात आली ज्याला लहान मुलांकडून खुप सुंदर प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी बनवून आणलेले किल्ले प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आणि त्यातून सर्वोत्कृष्ट किल्ला असे बक्षीस दिले गेले त्याचे ही मृणाल ताईंनी कौतुक केले.
याप्रसंगी काही पालकांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती जिथे ते म्हणाले “प्रथाच्या या शिवजयंती सोहळ्यामुळे आमच्या मुलांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल एक नवीन कुतूहल निर्माण झाले असून त्यांना आता शिवरायांबद्दल माहिती द्यायचे काम पालक व प्रथा यांनी संयुक्तिकरित्या पार पाडणे ही काळाची गरज आहे.”
दुसऱ्या एका पालकांनी म्हटले “मुलांनी आज अनेक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांसंबंधी बऱ्याच गोष्टी केल्या. प्रथा ने अश्याच नवनवीन संकल्पना घेऊन येत्या काळातही उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन करावे” अशी आशा व्यक्त केली. याठिकाणी प्रथा चे संस्थापक अध्यक्ष श्री सागर पाटील यांना त्यांच्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकातील सर्व सदस्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवून समर्थ साथ दिली. सागर पाटील पुढे म्हणाले “येणाऱ्या काळात असेच आणखीन उपक्रम प्रथा ची टीम करणार आहे जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या प्रथा – परंपरा आणि आपल्या संस्कृतीची ओळख होईल”
न्युज अनकट प्रतिनीधी : अंकुश जाधव