Adenovirus Infection: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे विषाणू आणि जिवाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. याच काळात ‘अॅडिनो’ (Adenovirus) व्हायरसमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे, अशी माहिती नेत्ररोगतज्ज्ञांनी दिली आहे. हा संसर्ग प्रामुख्याने हातांद्वारे पसरत असल्याने, नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणे आणि प्रसार;
या विषाणूमुळे डोळे लाल होणे, खाज येणे, डोळ्यांतून पाणी येणे अशी प्रमुख लक्षणे दिसतात. काही रुग्णांना तर सर्दी-ताप आल्यानंतर सुमारे सात दिवसांनी डोळ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दूषित हातांनी डोळे चोळल्यास हा विषाणू थेट डोळ्यांपर्यंत पोहोचतो. संक्रमित व्यक्तीने हाताळलेल्या वस्तू किंवा थेट संपर्कातूनही याचा प्रसार वेगाने होतो. डॉ. संगीता बाहेती, नेत्ररोगतज्ज्ञ यांच्या मते, “खोकला आणि शिंकेमुळेही याचा प्रसार होऊ शकतो. लागण झाल्यावर साधारणतः २ ते १४ दिवसांनंतर लक्षणे दिसतात आणि एक ते तीन महिने संसर्ग राहू शकतो.”
काय काळजी घ्याल?
या संसर्गापासून वाचण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी उपाययोजना करता येतात;
- हात स्वच्छ ठेवा: सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर वारंवार हात धुवा. साबण आणि पाण्याचा वापर करा किंवा सॅनिटायझरचा उपयोग करा.
- डोळ्यांना स्पर्श टाळा: डोळे चोळणे किंवा त्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळा.
- वैयक्तिक वस्तूंची देवाणघेवाण नको: टॉवेल, रुमाल, उशी किंवा मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत वापरू नका.
- क्लोरीनयुक्त पाण्याचा वापर: कमी क्लोरीन असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहणे टाळा, कारण त्यामुळेही संसर्ग वाढू शकतो.
- स्वच्छता राखा: हा विषाणू निर्जंतुक न केलेल्या पृष्ठभागांवर महिनाभर जिवंत राहू शकतो, त्यामुळे आसपासची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
लक्षणे दिसल्यास काय कराल?
डोळ्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ऐकीव माहितीवर आधारित घरगुती उपचार करणे टाळा, कारण यामुळे स्थिती बिघडण्याची शक्यता असते.

पावसाळ्यातील या ‘अॅडिनो’ व्हायरसच्या वाढत्या धोक्यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































