पुरंदर, दि. २१ जून २०२०: गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच निरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मात्र यावर्षी जून महिना आर्धा संपला तरी नीरा कोऱ्यात अजून तरी सुमारे १२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निरेच्या खोऱ्यात तब्बल ११.२१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा निरेच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पावसाने सुरवातीला चांगलीच ओढ दिली होती, मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे. धरणात पाणीसाठा पुरेसा आहे. त्यामुळे सध्या वीर धरणातून निरा डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाऊस उशिरा आला. परतीचा पाऊस खूपच बरसला. सुरवातीला कमी पडलेल्या पावसाने नंतर सरासरी ओलांडली. उशीरा आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामात पाण्याचा वापर कमी झाला होता. त्यामुळे पाण्याची मागणी रब्बीच्या हंगामात घटली होती. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरी निरेच्या खोऱ्यातील वीर,भाटघर, नीरा देवघर धरणात पाणी शिल्लक आहे.
आज दिनांक २१ जून रोजी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर धरणात १.९४ टी एम सी म्हणजे एकूण क्षमतेच्या १६ टक्के पाणीसाठा आहे.भाटघर धरणत ६.२५० टी. एम. सी. म्हणजेच २७.५९ टक्के पाणीसाठा आहे. वीर धरणत २.११० टी. एम. सी.म्हणजेच २२.४२ टक्के पाणीसाठा आहे. तर गुंजवणी धरणत ०.९७० टी. एम. सी. म्हणजेच २४.५७ टक्के एवढे पाणी शिल्लक आहे.
सध्या वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून ६७५ क्यूसेक्स तर उजव्या कालव्यातून ८५२ क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. निरेच्या खोऱ्यात एकूण ११.२१४ टी. एम. सी. एवढा पाणी साठा असून तो एकूण साठ्याच्या २३.२० टक्के एवढा आहे. मागील वर्षी याच तारखेला नीरा खोऱ्यात केवळ १.८३९ टी. एम. सी. म्हणजेच ३.१८ टक्के पाणी साठा होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे