आदिपुरुष’चे नवीन पोस्टर झाले रिलीज

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२२ : ‘आदिपुरुष’चे नवीन पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना प्रभासने लिहिले – ‘मर्यादा पुरुषोत्तम प्रभूश्री राम, आदिपुरुष १२ जानेवारी २०२३ रोजी IMAX आणि थ्रीडी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.’ सुपरस्टार प्रभास आज २३ ऑक्टोबरला त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभासच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आदिपुरुष या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात ‘आदिपुरुष’चा टिझर अयोध्येत लाँच केला होता, मात्र प्रेक्षकांना हा टिझर आवडला नाही. इतकेच नाही तर चित्रपटाच्या निर्मात्यांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अनेक संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी प्रेक्षक करत आहेत. मात्र, प्रभासच्या प्रचंड फॅन फॉलोइंगमुळे अनेक लोक या चित्रपटाच्या समर्थनातही आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत प्रभास ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाचे शूटिंग हिंदी आणि तेलुगूमध्ये केले आहे, हा चित्रपट हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये प्रभास प्रभु श्रीरामांच्या अवतारात दिसत आहे आणि त्याच्या मागे वानर सेना दिसतेय. प्रभासच्या या पोस्टरवर त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा