पुणे, २५ मे २०२३ : अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि ब्रिटिश अभिनेत्री पेज संधू इंडो-यूके सह-निर्मित चित्रपट ‘लायनेस’ मध्ये काम करण्यासाठी सज्ज आहेत. अलीकडील दोन ओटीटी रिलीज वेब सिरीज ‘ज्युबली’ आणि ‘ताज’ मध्ये अभिनयाने नवे विक्रम प्रस्थापित करणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने आता आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट सहनिर्मित बनत असलेल्या ‘लायनेस’ या चित्रपटात ती एक अशी व्यक्तिरेखा साकारणार आहे, ज्याच्यावर येत्या काळात संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागून राहील. कजरी बब्बर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट इतिहासकार पीटर बॅन्स यांच्या कार्यापासून प्रेरित आहे.


‘लायनेस’ हा चित्रपट ब्रिटनमधील दोन महिलांची अप्रतिम कथा आहे. भारतीय वंशाच्या या स्त्रिया दोन वेगवेगळ्या शतकांत राहिल्या आहेत. यापैकी एक म्हणजे सोफिया दलीप सिंग, जी महाराजा रणजित सिंग यांची नात आणि राणी व्हिक्टोरियाची दत्तक मुलगी आहे आणि दुसरी आहे मेहक कौर. सोफियाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. १८ नोव्हेंबर १९१० रोजी तीने अँब्लिन पंखर्स्टसह ब्लॅक फ्रायडे मार्चचे नेतृत्व केले होते. ब्रिटीश संसदेबाहेर ४०० हून अधिक लोकांनी केलेले हे प्रसिद्ध प्रदर्शन ब्रिटनमध्ये राहणाऱ्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी केले गेले होते. ब्रिटीश अभिनेत्री पेज संधू ‘लायनेस’ या चित्रपटात सोफियाची भूमिका साकारणार आहे.
‘लायनेस’ चित्रपटातील सोफियाचे पात्र जरी इतिहासाच्या पानांतून घेतले असले तरी दुसरे पात्र सध्याचे असून ते काल्पनिक दाखवले जाणार आहे. अदिती राव हैदरी ‘मेहक कौर’ या सुशिक्षित, विवाहित, एनआरआय महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा मेहकला सोफिया दलीप सिंगबद्दल कळते तेव्हा ती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास निघते. आदिती राव हैदरी म्हणाली की, “एका असामान्य स्त्रीचे जीवन आणि वारसा पडद्यावर आणणाऱ्या या कथेकडे मी लगेचच आकर्षित झाले; प्रिन्सेस सोफिया खऱ्या अर्थाने नायिका आहे, तर मेहक ही तितकीच सशक्त पात्र आहे जिचा प्रवास सिंहीणीच्या बरोबर आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर