दौंड तालुक्यात प्रशासकीय अधिकारी कोरोनाच्या जाळ्यात

दौंड, २ सप्टेंबर २०२०: दौंड तालुक्याचे गट विकास अधिकारी यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर आता तालुका आरोग्य अधिकारी यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. आठवडाभरात तालुक्यातील तीन अधिकाऱ्यांना बाधा झाली आहे.

दौंडचे गट विकास अधिकारी गणेश मोरे यांना २७ ऑगस्टला कोरोना विषाणूची बाधा झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांच्याकडील कार्यभार पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा कोरोनाच्या आजारातून बरे झालेले दिनेश अडसूळ यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी २ सप्टेंबर रोजी एका आदेशान्वये उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांच्याकडे गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांना २ सप्टेंबर रोजी कोरोनाची बाधा झाली आहे. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दौंड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनाच बाधा झाल्याने चिंता वाढली आहे. तसेच, दौंड उप विभागाच्या पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा व दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांची बदली झाल्याने ही पदे रिक्त असून, सध्या अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे.

सध्या दौंड तालुक्यात २९ एप्रिल ते १ सप्टेंबर २०२० या कालावधीत एकूण ११५५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी उपचारानंतर एकूण ७८३ जण बरे झाले आहेत. शहरातील १८ व ग्रामीण भागातील १७, असे एकूण ३५ नागरिकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यात सक्रिय बाधितांची संख्या ३३७ इतकी आहे तर दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली असल्याने कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा