औरंगाबाद, १ सप्टेंबर २०२२: जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या हा काळजीचा विषय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शाळेमध्ये प्रयत्न केला जातो. पण, या शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी मदरशामध्ये शिक्षण घेत असल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये उघड झाला आहे.
औरंगाबादच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी पत्राद्वारे हा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांत शिक्षणासाठी जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
शाळेच्या पटावरील किती विद्यार्थी शाळेच्या वेळेत मदरशांत शिक्षणासाठी जातात यांची माहिती दि.०१/०९/२०२२ पर्यत न चुकता या कार्यालयास सादर करावी, असे निर्देश चव्हाण यांनी या पत्रात दिले आहेत. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देणारी संस्था म्हणून मदरशांची ओळख आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थीना यामध्ये प्रवेश दिला जातो. धार्मिक शिक्षण कायम ठेवत आधूनिक शिक्षण दिले जाते असा मदरशांचा दावा आहे. त्याच बरोबर देशातील काही मदरशांवर कट्टरवादाचे शिक्षण दिल्याचा आरोपही यापुर्वी झाले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर