‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’च्या सुरक्षा आणि नियोजनासाठी मसिआ व पोलिस प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो – 2026’ या राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रदर्शनाच्या तयारीला आता वेग आला असून, त्याच्या सुरक्षा आणि सुयोग्य नियोजनासाठी मसिआचे पदाधिकारी आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा. विनयकुमार राठोड (भा.पो.से.) यांच्या नेतृत्वाखालील पथकासोबत महत्त्वपूर्ण बैठक आज ऑरीक येथे पार पडली.

19 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या बैठकीत एक्स्पोच्या संपूर्ण आराखड्याबाबत तसेच चार दिवस चालणाऱ्या भव्य औद्योगिक मेळ्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या पोलिस सहकार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एक्स्पोच्या वैशिष्ट्यांची माहिती देताना मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड आणि उपाध्यक्ष राहुल मोगले यांनी हे प्रदर्शन राज्यातील सर्वात मोठे औद्योगिक आयोजन असून यात देश-विदेशातील नामांकित उद्योगसमूह सहभागी होणार असल्याचे सांगितले. 1500 पेक्षा जास्त औद्योगिक स्टॉल्स, सुमारे 4 लाखांपर्यंत भेट देणारे व्यावसायिक आणि उद्योजक, तसेच 57 एकर जागेवर उभारण्यात येणारे विशाल प्रदर्शन क्षेत्र यामुळे हा एक्स्पो औद्योगिक क्षेत्रासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.

बैठकीत सुरक्षा, वाहतूक नियंत्रण, परवानग्या, ड्रोन वापरासाठी स्वतंत्र मंजुरी, तसेच एक्स्पो परिसरात पोलिस मदत केंद्र उभारणी यावर सखोल चर्चा झाली. एक्स्पो काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याशिवाय कार्यक्रमासाठी आवश्यक परवाने, सुरक्षा उपाय, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेचे नियोजन यांचाही आढावा घेण्यात आला.

या सर्व बाबींवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा. विनयकुमार राठोड यांनी एक्स्पो यशस्वी व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एक्स्पोच्या ठिकाणी पोलिस मदत केंद्र उभारणे, वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक नेमणे आणि सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी पोलिस प्रशासनाकडून पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, पोलिस उपअधीक्षक पूजा नागरे, ट्रॅफिक विभागाचे पोलिस निरीक्षक आनंद झोटे, करमाडचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, चिकलठाणाचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मसिआतर्फे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, माजी अध्यक्ष आणि एक्स्पो संयोजक चेतन राऊत, उपाध्यक्ष राहुल मोगले, मनीष अग्रवाल, सचिव सचिन गायके, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र चौधरी आणि इन्फ्रा हेड सुरेश खिल्लारे यांनी सहभाग नोंदविला.

मसिआ आणि पोलिस प्रशासनातील ही सामंजस्यपूर्ण बैठक ‘अ‍ॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ अधिक सुरक्षित, सुयोजित आणि भव्यदिव्य करण्याच्या दिशेने उचललेले महत्वाचे पाऊल ठरले आहे.