नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३ : जी २० शिखर परिषदेला (G20 Summit) आजपासून राजधानी दिल्लीत सुरुवात झाली आहे. या शक्तीशाली आंतरराष्ट्रीय समुहाचं यजमानपद हे भारतासाठी अभिमानास्पद आहे. आज या बैठकीच्या निमित्तानं एक ऐतिहासिक घोषणाही झाली. जी २० आता लवकरच जी २१ म्हणून ओळखला जाणार का…? ज्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष होतं ती महत्वाची घोषणा अखेर भारतात झाली आणि तीदेखील यजमान असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडूनच करण्यात आली. आफ्रिकन युनियन हाही आता जी20 परिषदेचा कायमचा सदस्य असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.
शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधानांनी आफ्रिकन युनियनला G20 चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पीएम मोदींनी अध्यक्ष म्हणून ते मंजूर करताच आफ्रिकन युनियनचे प्रमुख अजली असोमानी यांनी जाऊन पंतप्रधान मोदींना मिठी मारली. भारताच्या प्रस्तावाला चीन आणि युरोपीय संघानेही पाठिंबा दिला होता. आफ्रिकेतील 55 देशांना संघाचे सदस्यत्व मिळाल्याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जगात विश्वासाचे संकट निर्माण झाले असल्याचे सांगितले. २१वे शतक जगाला नवी दिशा देणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे गळाभेट घेत स्वागत केले. त्याचवेळी बायडेन यांना भारत मंडपममध्ये बांधलेल्या कोणार्क चक्राची माहिती दिली. समिटची सुरुवात फोटो सेशनने झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वागत भाषण केले. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळी भारतात आले आहेत.
जी 20 मध्ये मोदींच्या १५ द्विपक्षीय बैठकांकडेही लक्ष असणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी ,३ दिवसांत १५ द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. त्यात अमेरिका, सौदी अरेबियासोबतच्या त्यांच्या बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अमेरिकेसोबत जेट इंजिनची भारतात निर्मिती करण्यासंदर्भात आणि मिलिट्री ड्रोन खरेदी करण्यासंदर्भात काही महत्वाचे करार होतात का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भारत- अमेरिका- सौदी अरेबिया यांच्यात युरोप मिडल इस्ट आणि भारत रेल्वे आणि बंदर मार्गानं जोडण्याबाबतही काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे