मणिपूरमध्ये AFSPA कायदा सहा महिन्यांसाठी वाढवला, १ ऑक्टोबरपासून होणार लागू

इंफाळ, २७ सप्टेंबर २०२३ : मणिपूरचा डोंगराळ भाग पुन्हा कडक सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायद्यांतर्गत ठेवण्यात आला, तर खोऱ्यातील १९ पोलीस ठाण्यांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात हा कायदा पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला असून तो १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले. ज्या पोलीस ठाण्यांमध्ये हा कायदा लागू झाला नाही त्या भागात इंफाळ, लानफेले, सिटी, सिंगजामेई, सेकमाई, लामसांग, पास्तोल, वांगोई, पोरोम्पत, हंगंग, लमलाई, इरिबुंग, लीमाखोंग, थौबल, बिष्णुपुर, नंबोल, मोइरांग, काक्चिन आणि जिराबाम यांचा समावेश आहे.

मणिपूरमध्ये मे महिन्यापासून सुरू असलेला हिंसाचार थांबत नाहीये. त्याचवेळी राजधानी इंफाळमध्ये दोन विद्यार्थ्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी रॅली काढली. यादरम्यान मंगळवारी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये ४५ विद्यार्थी जखमी झाले. जखमींमध्ये बहुतांश मुली असल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूरची बिघडलेली स्थिती पाहता बिरेन सिंग सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्याला ‘अस्थिर क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा